Wednesday, June 19, 2019

विपस्सना: राजा ढाले

विपश्यना एक थोतांड
१९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अभूतपूर्व अशा धम्मक्रांतिनंतर त्या चळवळीला खो घालणारे किंवा त्या वैचारिक क्रांतिला चुकीच्या दिशेने नेणारे असे अनेक प्रवाह, फाटे काही लोकांनी फोडले. त्याचं एक दृश्य स्वरूप म्हणजे सत्यनारायण गोयंका यांनी १९७२ सालापासून सुरू केलेली विपश्यना ही चळवळ. विपश्यना म्हणजे आत पहाणं असा तिचा अर्थ असेल तर आत म्हणजे नेमकं कुठे? हा एक अतिशय जटील आणि भोंगळ प्रश्न आहे. खरं तर बाबासाहेब आंबेडकर ४ डिसेंबर १९५४ रोजी रंगूनच्या जागतिक धम्म परिषदेला गेले असताना तिथल्या बौद्ध शासनसभा या संस्थेला जो मेमोेरेण्डम (खलिता) दिला, त्या खलित्यामध्ये ‘मेडिटेशन,’ ‘कॉन्टम्प्लेशन’ आणि ‘अभिधम्म’ या गोष्टी भारतातील होऊ घातलेल्या बौद्ध चळवळीला आणि बौद्धांना मारक ठरतील हे भविष्य आधीच वर्तवलं होतं.
परंतु बाबासाहेबांनी आपली चळवळ धम्माशी निगडित केली. तर गोयंका गुरुजींनी नेमकी ती उलट्या दिशेने नेली. म्हणजे अभिधम्माकडे नेली. आज आमच्या मनात धम्म आणि अभिधम्म यांच्यातील द्वंद्व वैचारिक पातळीवर स्पष्ट होत असताना गोयंका गुरुजींनी अभिधम्माचा होऊ घातलेला पर्यायाने महायानाचा होऊ घातलेला पुनःउद्धार ही गोयंका गुरुजींची उलटी दिशा निश्चितच बौद्ध धम्माच्या निखळ स्वरूपाला घातक ठरणारी आहे. गोयंका गुरुजींनी आम्हाला विचाराकडून निर्लेप समाधीकडे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो घातक आहे. कारण निर्विकल्प समाधी म्हणजे विचाराशिवाय असलेली समाधी. जिथे विचार संपतात तिथे सगळेच अगतिक होतात. अशा तर्हेचा अगतिक आणि लाचार समाज, भोंगळ समाज गोयंका गुरुजींना अभिप्रेत होता काय? अशी त्यांच्या कार्याबद्दल शंका यायला वाव आहे.
जिथे विचारच संपतात तिथे अविचाराचा, अलौकिकतेचा, अभौतिकतेचा आणि पर्यायाने सर्व अंधश्रद्धांचा उगम सहज शक्य आहे. अशावेळी बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धम्म अथवा गौतम बुद्धांनी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा विचार आणि पुनर्विचार करण्याची आम्हाला दिशा दिली आहे, ती सोडून आम्ही मूर्खाच्या नंदनवनात वावरण्यासाठी विपश्यनेच्या रूपाने मोकळे झालो आहोत, असं मला वाटतं.
विपश्यना केल्यामुळे जर ज्ञान प्राप्त होणार असेल, डोळे मिटून राहिल्याने जर ज्ञान प्राप्त होणार असेल तर बाबासाहेबांनी जगातल्या तीन विख्यात विद्यापीठात अभ्यास करून त्यातील दोन खंडातील विद्यापीठांच्या अत्युच्च पदव्या प्राप्त केल्या, त्याऐवजी त्यांनी डोळे मिटून स्वस्थ बसण्याचा पर्याय का स्वीकारला नाही? किंवा राजगृहासारखी केवळ गं्रथसंपदा जपणारी इमारत बांधून अहर्निश अभ्यास तरी का केला? गोयंकांच्या मते, विपश्यना हाच जर ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग असेल तर बाबासाहेबांनी हा विद्या शिकण्याचा खटाटोप तरी का केला? म्हणजेच बाबासाहेबांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’मध्ये विपश्यनेचा प्रचार करण्याऐवजी बुद्धांच्या तर्कशुद्ध विचारांचा प्रचार केला आहे. त्याचा अर्थच असा की, बाबासाहेब बुद्धांच्या विचारामुळेच जगाचा विकास होईल असं मानत होते. तर गोयंका गुरुजी तो विचारच थोपवत होते. आणि त्यात ‘हीन’ मिसळत होते.
इथल्या भोळ्याभाबड्या जनतेला विपश्यनेच्या मार्गाने नेण्यासाठी त्यांनी जे परिश्रम केले ते धम्माच्या प्रचारासाठी केले असते तर बरं झालं असतं. याउलट गोयंका गुरुजींनी आपल्या विपश्यना केंद्राच्या जगभर शाखा काढण्याचा प्रयत्न केला. कशासाठी? त्यांनी असं म्हटलं की, विपश्यनेचं मूळ हे वेदाच्या शिकवणीत आहे. असं असेल तर जे अहिंदू आहेत, जे ब्राह्मणेतर आहेत अशा लोकांना बौद्धधम्माच्या नावाने वैदिक साधना पद्धती का शिकवत होते हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच गोयंका गुरुजी हे जनसामान्यांना फसवण्याच्या मार्गातील एक मोठा कट होता असं म्हणावं लागेल.
गौतम बुद्धाचा विचार शिकवण्याऐवजी गौतम बुद्धाच्या आचार पद्धतीचे चुकीचे अर्थ लावून त्यावर विकसित केलेली विपश्यना ही एक समाजाला दिलेली भूल आहे. उदाहरणार्थ, बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध व्हायला सांगितलं. बुद्ध व्हायला सांगितलं नाही. बुद्धाची जागा घ्यायला सांगितलं नाही. बुद्ध हा आमचा आदर्श आहे. ते मागे सारून तुम्हीही बुद्ध बनू शकता अशा तर्हेची शिकवण देणं आणि बुद्धाला छोटं बनवणं हा होतो.
खरं तर बुद्धाने सदाचाराची शिकवण दिली. परंतु लोकांना सदाचार सांगण्याऐवजी त्यांना बुद्धाच्याच स्थानावर नेऊन ठेवण्याचा प्रचार करतात हे कशासाठी? कारण बुद्ध हे तत्त्वज्ञान आहे आणि ते डोळे मिटून घेण्याचं नव्हे तर डोळे उघडण्याचं तत्त्वज्ञान आहे. म्हणूनच विपश्यनेतून बुद्धाचा वसा आणि वारसा आज पुन्हा धोक्यात येण्याची शक्यता आहे.
खरं तर भारतात फुले-आंबेडकरांनी जी शैक्षणिक क्रांती केली आहे, तळागाळातल्या लोकांना शिक्षण घेण्याची जी सुसंधी मिळवून दिली आहे आणि त्यामुळे सरकारी नोकर्यांचे आणि ‘मार्यांच्या’ जागांचे दरवाजे खुले करून एक नवा इतिहास घडवला आहे. तळागाळातल्या लोकांना वर उचलण्याचा आणि त्यांनाही समतेच्या द्वारात उभं करण्याचा जो निखालस आणि अभूतपूर्व पराक्रम केलाय तो धुळीत मिळवण्यासाठी, त्यांना शिक्षणाचे दरवाजे बंद करण्याचा आणि पुन्हा त्यांच्या मूळ स्थितीला नेण्याचा हा प्रतिक्रांतिवाद्यांचा डाव आहे आणि त्यात विपश्यना ही अग्रगामी आहे. आमच्यातले काही उच्च पदस्थ अधिकारीसुद्धा या डावाला बळी पडून शिक्षणाच्या क्षेत्रातसुद्धा विपश्यनेचा शिरकाव करताना आढळतील. त्यांना बाबासाहेब म्हणजे काय? अभिधम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे काय? हे कधी कळलं आहे काय? म्हणूनच कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ठरलेले हे अधिकारी ‘आत’ पाहण्याऐवजी आपल्या सभोवतालच्या जगाकडे डोळे उघडून पाहतील तर फार बरं होईल.
अलीकडेच श्रीमान सत्यनारायण गोयंका यांच्या निधनानिमित्त २ ऑक्टोबर २०१३ च्या वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीनुसार त्यांच्याबद्दलची माहिती प्रकट झालीय. त्यात ही जाहिरात म्हणते, ‘महाकारूणी भगवान गौतम बुद्धांनी शिकवलेली ही महाकल्याणकारी पण मागील २००० वर्षे लुप्त झालेली विपश्यना विद्या बर्मा येथून भारतामध्ये आणून श्री. गोयंकांनी आपल्या अथक परिश्रमांनी फक्त भारतातच नाही तर जगातल्या सर्व देशांमध्ये आणि प्रत्येक जाती, संप्रदाय तसेच वर्गातल्या लोकांमध्ये केवळ चार दशकांच्या काळात पोचवली.’ या अवतरणावरून आपल्या लक्षात येतं की, भगवना गौतम बुद्धांनी शिकवलेली विपश्यना मागील २००० वर्षांमध्ये लुप्त झाली असेल तर आत्ताच ती प्रकट कशी झाली? विपश्यनेचं स्कूल बंद पडलं असताना हे स्कूल कुठल्याही ट्रेनिंगशिवाय सुरूच कसं झालं? म्हणजे विपश्यना हे बुद्धाच्या विचारांवर केलेलं आरोपण आहे, असं माझं ठाम मत आहे. बुद्ध ४५ वर्षं लोकांमध्ये फिरताना आढळतो तो लोकांनी विचार करण्यासाठी होय. लोकांनी डोळे मिटण्यासाठी नव्हे. खरं तर जगातील स्पर्धांमध्ये आम्ही विनष्ट व्हावं आणि पुन्हा मागासलेले बनावं हीच तर आंतरिक इच्छा नाही ना…? खरं तर गोयंका गुरुजी बर्मामध्ये उद्योजक म्हणून होते. काही काळ त्यांना मायग्रेनचा उपद्रव सुरू झाला. तेव्हा तिथल्या ऊ बा खिन मेमोरिअल ट्रस्टमध्ये त्यांच्यावर त्याच नावाच्या माणसाने उपचार केले आणि फरक पडला. ऊ बा खिनने प्रभावित झालेले सत्यनारायण गोयंका हे विपश्यनेकडे वळले. म्हणजे विपश्यनेच्या नावाने जे स्कूल उत्पन्न झालं ते ऊ बा खिन यांनी जन्माला घातलं होतं, ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. अशा तर्हेच्या अंधभक्तीतून यदाकदाचित पूर्वी विपश्यना व्यवहारात असेलच किंवा प्रचलित असेल तर तिचं स्वरूप आणि आजचं स्वरूप एकच आहे, असं म्हणायला काहीही आधार नाही. आणि आजच्या स्पर्धेच्या जगात, भौतिक जगात विपश्यनेची काहीही गरज नाही, असं माझं मत आहे.
गौतम बुद्धाच्या विचारांमुळे जगात जी क्रांती होईल ती आधुनिक शस्त्र आणि शास्त्रामुळे नव्हे तर त्याने मानवा हाती दिलेल्या अहिंसक क्रांतिच्या मार्गाने. आज जगाची सगळी स्पर्धा ही एका देशाने दुसर्या देशाला पाण्यात पाहणारी, आंधळी आहे. तिला डोळस बंधुभावात रूपांतरित करण्याची फार मोठी गरज आहे. त्यामुळे गोयंका गुरुजींनीही ध्यानाचा बाजार केला आणि अडाणी लोकांना त्यात फशी पाडलं. यामुळे त्यांच्या निधनानंतर तरी योग्य चर्चा होणार आहे का?
अत्ता ही अत्तनो नाथो,
अत्ता हि अत्तनो गति।
असं गोयंका गुरुजींच्या शोकसंदेशपर जाहिरातीत म्हटलंय. हे नवीन वचन जोडलं आहे. माणूस स्वयंप्रभ माणूस होण्यासाठी या फसव्या गतीची काहीच गरज नाही. तो फक्त स्वतःच्या मालकीचा असायला हवा एवढंच माझं म्हणणं आहे.
– राजा ढाले(साप्ताहिक 'कलमनामा' तून साभार...13 आक्टो 2013)

No comments:

Post a Comment