Tuesday, December 1, 2020

Chakma

sanjay Savant Navi Mumbai(www.sanjaysat.in)

चकमा" प्राचीन बौद्ध परंपरा जोपासणारा एक समाज  

'चकमा' एक प्राचीन जमात असून तिचा इतिहास बुद्धांच्या काळापासून ज्ञात असल्याचे दिसते. मगध शहरांमध्ये या समाजाचे वास्तव्य होते. ही जमात स्वतःला शाक्य कुळातील मानते आणि बौद्ध परंपरा पाळते. प्राचीन मगध देशातुन म्हणजेच आताच्या बिहारमधून त्यांचे हळूहळू स्थलांतर झाले. हिमालयातील काही प्रांतात ते विसावले. तर काहीजण अरक्कन प्रांतात (म्यानमार) स्थलांतरित झाले. मात्र बहुसंख्य बांगलादेशच्या चित्तगाव टेकड्यांच्या प्रदेशात (Chittagong Hill Tracts ) विखुरले. चित्तगाव हे बांगलादेशातील मोठे बंदर असून हजारो वर्षापूर्वी तेथे असलेल्या असंख्य चैत्यामुळे त्याला चैत्यग्राम असे म्हणत असत. ब्रिटिशांनी त्याचे चित्तगाव केले व तेथील प्राचीन चकमा समाजास स्वायत्तता दिली. आज या चित्तगाव पर्वतीय प्रदेशात चकमा समाज प्रमुख असून त्यांचे सोबत मारमा, तांचाग्या आणि बरुआ हा बौद्ध समाज सुद्धा रहात आहे व आपापल्या बौद्ध परंपरा पाळीत आहे.

सन १९६४ मध्ये बांगलादेशातील कर्णफुली नदीवरील धरणामुळे चकमा समाज विस्थापित झाला व आजूबाजूच्या प्रदेशात व देशात पसरला. नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सी या भूभागावर म्हणजेच नेफा ( NEFA ) येथे अनेकजण स्थलांतरित झाले. सन १९७२ मध्ये नेफाचे नाव अरुणाचल प्रदेश झाले. सद्यस्थितीत पूर्वेकडील बांगलादेश, म्यानमार या देशात व भारतामध्ये मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यात चकमा समाज विखुरलेला आहे. त्यांनी थेरवादी बौद्ध परंपरा जोपासली असून तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. बांगलादेशात आता अल्पसंख्याक चकमा समाजाच्या विकासासाठी प्रांतीय कौन्सिल स्थापन केले आहे. तसेच भारतात देखील २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतातील चकमा समाजास भारतीय नागरिकत्व देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. शाक्य कुळ असलेला हा समाज स्वतःला सूर्यवंशी तसेच लढवय्या समजतो. त्यांचे प्राचीन ग्रंथ पाली भाषेत आहेत. तसेच पौर्णिमेचे सर्व सण हा समाज साजरा करतो.

आता या समाजाची बोलीभाषा बंगाली असून वर्णमाला  मुळाक्षरे बंगाली आहेत. यांच्या प्रत्येक गावात एक बौद्ध विहार असतेच. त्या विहारातील भिक्खुंना खूप मान असतो. येथील सर्व व्यवस्था या समाजातील वरिष्ठ लोक पाहतात. चकमा समाज बुद्धमाता 'महामाया देवी' यांना लक्ष्मीदेवी म्हणून पूजतो. बुद्ध पौर्णिमा हा सण तर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुरुषांचा पेहराव शर्ट-पॅन्ट असतो. मात्र महिला सणांच्या दिवशी पारंपरिक रंगीत वेशभूषा परिधान करतात. विहाराला भेट देतात. तेथे सामूहिक बुद्ध वंदना आणि ध्यान साधना केली जाते. बुद्धमूर्तीला फुले-फळे अर्पण करतात. भिक्खुंचे आशीर्वाद घेतात.

बंगाली नवीन वर्षाचा सण 'बिशु' सुद्धा या समाजात तीन दिवस साजरा केला जातो. बंगाल या नावाचा उदय मुळात बौद्ध संस्कृतीवरून झालेला आहे. या प्राचीन वंग प्रदेशात म्हणजेच आताच्या बांगलादेशात पाल राजवटीत एकेकाळी बारा बौद्ध विद्यापीठे कार्यरत होती. धम्म संस्कृतीचे पडघम त्यावेळी तेथे दुमदुमत होते. मात्र १२ व्या शतकातील तुर्कीश आक्रमणांनी (बक्तियार खिलजी) होत्याचे नव्हते केले. विध्वंसाचा चिखल झाला. विहारे उध्वस्त केली. इतिहासाची ही पाने चाळताना खिन्नता वाटते. अजूनही तिथल्या काही मस्जिदीनां 'बुद्धेर मोक्कान' म्हणतात. आजही अल्पसंख्याक असलेल्या बंगाली बौद्ध, चकमा व इतर जमातींनी अन्यायाचा प्रतिकार करीत बौद्ध परंपरा जपली आहे. म्हणूनच त्यांचे कौतुक करावेसे वाटते.

No comments:

Post a Comment